अनिकेत कांबळे
Manager's Message
संस्कार काळाची गरज आहे. योग्य आचार विचार, गुण-अवगुण हे ओळखण्याची क्षमता म्हणजे संस्कार, संस्कार व शिक्षण यांचा मिलाफ झाला तर सुसंस्कारित जीवन घडेल, शिक्षणामुळे मनुष्यास शहाणपण येते. संस्कारामुळे आयुष्याला वळण मिळते. शिक्षण घेतले म्हणजे संस्कार घडतीलच असे नाही तर संस्कार रुजवावे लागतात, संस्कार काळाची गरज आहे. संस्काराची सुरुवात घरापासून होते. शाळा, परिसर हे सुद्धा संस्काराचे केंद्र आहेत.
बालकावर संस्कार कुटुंबातील व्यक्ती करतात. आजोबा, आजी हे तर जुन्या पिढीतील संस्काराचे व्यासपीठ होते. विशेषतः आजीबाई, आजीचा बटवा उघडला की त्यातून खजिना बाहेर पडत असे. त्या बटव्यात गोष्टी असत. विनोद असत, नकला असत, जात्यावरच्या ओव्या असत, बडबडगीते व गाणी असत, आयुर्वेद असे, आजी म्हणजे शिक्षक, वैद्य, कलाकार या सर्व भूमिका शानदार उठवीत असे. आजच्या पिढीला अशा आजीची कमतरता नक्की जाणवत असेल. आईची भूमिका पण बालकाच्या जडणघडणीत खूप महत्त्वाची राहिली आहे. बालक आईजवळ असते. बालकाची भाषा आईसोडून बाकीच्या लोकांना लवकर समजत नाही. आईचे स्थान बालकाच्या आयुष्यात फार महत्त्वाचे असते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करावा. आपल्यापेक्षा मोठ्या भावाला दादा व बहिणीला ताई म्हणायचे. सर्वांची छोठी शक्य असणारी कामे ऐकायची, शेजारील व परिसरातील व्यक्तींचा आदर करावा असे संस्कार आई लहानपणी बालकावर रुजवत असते. वडील बाहेरील परिस्थीतिची व गरीबीची, काटकसरीची, व्यवहाराची जाणीव प्रसंगानुरूप करून देतात.